मजुरीला गेल्याशिवाय चूल पेटणार कशी ?’… ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाईंच्या शब्दांनी पालकमंत्री गहिवरले !

Spread the love

दुष्काळाच्या वेदना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक थेट शेताच्या बांधावर ; कष्टकरी महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

‘माझी आई आज असती, तर तीही तुमच्याच वयाची असती … पालकमंत्र्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

धाराशिव – वयाची ऐंशी वर्षे उलटली… हातापायांत पूर्वीसारखी ताकद उरलेली नाही… तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात शेतात राबण्याशिवाय पर्याय नाही.दुष्काळाने शेती हिरावून घेतली,रोजगाराच्या संधी कमी झाल्या पण जगण्याचा संघर्ष काही थांबलेला नाही.अशाच परिस्थितीत शेतात खुरपणी करणाऱ्या ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाई मुंडे यांच्याजवळ पालकमंत्री प्रताप सरनाईक पोहोचले.आपुलकीने त्यांनी विचारले,मावशीबाई,एवढ्या वयातही तुम्ही शेतात काम करता ? त्यावर अनुसयाबाईंनी दिलेले उत्तर काळजाला भिडणारे होते.साहेब,मजुरीला गेल्याशिवाय आमचं कुटुंब कसं चालणार ? दिवसभर राबल्यावर दोनशे रुपये मिळतात. त्यावरच आमचं पोट भरतं.हे शब्द ऐकून पालकमंत्रीही काही क्षण नि:शब्द झाले.पुढे त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी या भेटीला आणखी हृदयस्पर्शी वळण मिळाले.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी २ व ३ नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला.या दोन दिवसांत त्यांनी विविध ठिकाणी जाऊन संकटग्रस्त कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप केले.मात्र,या दौऱ्यातील सर्वाधिक भावस्पर्शी प्रसंग घडला तो कळंब तालुक्यातील उपळाई शिवारात.कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना पालकमंत्र्यांनी आपला वाहनांचा ताफा थेट शेताच्या बांधावर थांबवला आणि कष्टकरी महिलांच्या सुखदुःखात सहभागी झाले.

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील कार्यक्रम आटोपून पालकमंत्री सरनाईक वाशी तालुक्यातील पारगावकडे निघाले होते.वाटेत उपळाई शिवारातील दत्ता मोरे यांच्या शेतात काही वयोवृद्ध आणि कष्टकरी महिला खुरपणीचे काम करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उन्हातान्हात राबणाऱ्या या महिलांना पाहून त्यांनी वाहनांचा ताफा थांबवण्यास सांगितले. शासकीय दौऱ्याची औपचारिकता बाजूला ठेवत ते थेट शेतात गेले. अचानक पालकमंत्री आपल्या समोर आल्याने या महिला क्षणभर आश्चर्यचकित झाल्या.मात्र,त्यांनी केलेल्या आपुलकीच्या चौकशीमुळे संवादाला सुरुवात झाली.

या महिलांमध्ये सर्वात वयस्क ऐंशी वर्षांच्या अनुसयाबाई मुंडे यांच्यासह तोलाबाई ओव्हाळ, लक्ष्मीबाई ओव्हाळ,शांता ओव्हाळ,कौशल्या ओव्हाळ, राजाबाई जाधव,बेगाबाई ओव्हाळ आणि चंद्रकांत शिंदे यांचा समावेश होता.प्रत्येकाची परिस्थिती जवळपास सारखीच. घरातील पुरुष मंडळी आणि मुले रोजगाराच्या शोधात मुंबई- पुण्यासारख्या शहरांत गेलेली. गावात राहिलेल्या महिलांच्या वाट्याला शेतीमजुरी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी आलेली. दिवसभर शेतात कष्ट करून मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून संसाराचा गाडा हाकण्याची त्यांची धडपड सुरू होती.

पालकमंत्र्यांनी प्रत्येक महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. घरात किती माणसे आहेत,घरधनी व मुले कुठे काम करतात,रोज किती मजुरी मिळते,दुष्काळामुळे रोजगारावर काय परिणाम झाला, अशा अनेक प्रश्नांतून त्यांनी या कुटुंबांच्या जगण्यातील अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी महिलांनीही आपल्या मनातील व्यथा मोकळेपणाने मांडल्या.‘साहेब,दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,हे खरे आहे.पण आम्हा शेतमजुरांचेही हाल होत आहेत. शेतात कामच नसेल तर आम्ही कुठे जायचे ? सरकार जसा शेतकऱ्यांचा विचार करते,तसाच आमचाही करावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या शब्दांत केवळ मदतीची मागणी नव्हती,तर ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या जगण्याचा संघर्ष दडलेला होता.शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांच्या रोजगारालाही दुष्काळाचा मोठा फटका बसत असल्याचे वास्तव या संवादातून समोर आले. पालकमंत्र्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाकडून शेतमजुरांच्या प्रश्नांचाही निश्चितपणे विचार करण्यात येईल,असे आश्वासन दिले.

‘माझी आई आज असती तर…
अनुसयाबाईंचे वय आणि या वयातही सुरू असलेली त्यांची कष्टाची धडपड पाहून पालकमंत्री सरनाईक भावुक झाले.माझी आई आज असती,तर तीही तुमच्याच वयाची असती,असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.त्या क्षणी मंत्री आणि मजूर यांच्यातील औपचारिकतेची जागा माणुसकीच्या नात्याने घेतली होती.एका वृद्ध मातेच्या कष्टांमध्ये त्यांना स्वतःच्या आईची आठवण झाली.शेतातील त्या काही क्षणांच्या भेटीतून मायेचा आणि जिव्हाळ्याचा अनोखा प्रत्यय आला.

पालकमंत्र्यांनी या महिलांना दिवाळीचा शिधा दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रत्येक महिलेला पाच हजार रुपयांची रोख रक्कम दिवाळी भेट म्हणून दिली.तुम्ही आयुष्यभर कष्ट केले आहेत.आता दिवाळी आनंदाने साजरी करा,अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या. अचानक मिळालेल्या या भेटीमुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना दिवाळीचा शिधा वाटप करण्यासाठी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी २ व ३ नोव्हेंबर रोजी विविध भागांना भेटी दिल्या. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी,उमरगा आणि लोहारा तालुक्यांतील येणेगुर व जेवळी, धाराशिवजवळील सांजा, तालुक्यातील पळसप,कळंब तालुक्यातील येरमाळा तसेच वाशी तालुक्यातील पारगाव येथे आयोजित कार्यक्रमांतून त्यांनी शेतकरी आणि संकटग्रस्त कुटुंबांना दिवाळीच्या शिध्याचे वाटप केले.

या भेटीदरम्यान त्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या.शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरीब कुटुंबांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देणे ही केवळ शासकीय जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकीही असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून पाच हजार रुपयांची मदत जमा करण्यास सुरुवात झाल्याचेही त्यांनी या दौऱ्यात सांगितले.तसेच भविष्यात मिळणारी शासकीय मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल,अशी ग्वाही दिली. दिवाळीचा शिधा ही मदतीची सुरुवात असून,संकटग्रस्त कुटुंबांना पुढील काळातही सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळाच्या वेदनांना माणुसकीची फुंकर
दुष्काळाचे चटके केवळ शेतजमिनीला बसत नाहीत,तर त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कष्टकरी हातांनाही बसतात.पिके करपली की शेतकऱ्याचे उत्पन्न घटते आणि शेतमजुरांच्या हातचे कामही कमी होते.रोजगारासाठी होणारे स्थलांतर,घरातील वृद्धांवर पडणारी जबाबदारी आणि रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता,असे अनेक प्रश्न ग्रामीण कुटुंबांसमोर उभे राहतात.

उपळाईच्या शिवारातील महिलांनी मांडलेल्या व्यथा या अशाच वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या होत्या.पालकमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांची केवळ दखल घेतली नाही, तर ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांना दिलेल्या भेटीतून आपुलकीचा आधारही दिला.

‘दोनशे रुपयांसाठी दिवसभर राबावं लागतं…… या अनुसयाबाईंच्या एका वाक्याने दुष्काळातील शेतमजुरांच्या जगण्याची वेदना समोर आणली. तर ‘माझी आई आज असती तर… या पालकमंत्र्यांच्या शब्दांनी त्या भेटीला माणुसकीचा ओलावा दिला.

दुष्काळाच्या सावटाखाली सण साजरा करणाऱ्या या कष्टकरी महिलांसाठी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट हा केवळ आर्थिक आधार नव्हता,त्यांच्या श्रमांची आणि संघर्षाची कोणीतरी दखल घेतल्याची जाणीवही होती. उपळाईच्या शेतात घडलेला हा प्रसंग पालकमंत्र्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यातील एक हृदयस्पर्शी आठवण ठरला.

  • Related Posts

    श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

    Spread the love

    Spread the loveतुळजापुर – श्रृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची…

    नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांचा कळंबमध्ये जंगी सत्कार; धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार!

    Spread the love

    Spread the loveकळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन; पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन.. धाराशिव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नवनियुक्त झाल्याबद्दल श्री. सचिन तावडे यांचा कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *