निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची दक्षता घ्या,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश

धाराशिव – भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असून,विविध कामांसाठी नोडल अधिकारी तसेच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व पथकांवर निवडणूकविषयक कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय,पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. विशेषतः निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही,याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज १४ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तसेच विविध कक्षांकडून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.

बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती.अरुणा गायकवाड,वाहन परवाना व विविध परवाने वितरण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,कायदा व सुव्यवस्था कक्षाचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,मतदान व्यवस्थापन कक्षाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, मतपत्रिका तपासणी व वाटप कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अवैध दारू वाटपास प्रतिबंध कक्षाचे नोडल अधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,प्रशिक्षणाशी संबंधित कक्षाच्या नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती.सुधा साळुंखे,मूलभूत सोयीसुविधा कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,स्ट्राँग रूमचे नोडल अधिकारी तथा धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्ञानराज पौळ, आयटी ॲप्लिकेशन कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अंकित सिंग, टपाली मतपत्रिका कक्षाचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार प्रकाश व्हटकर,जम्बो मतपेट्याचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय गायकवाड आणि मतदार मदत कक्षाचे नोडल अधिकारी तथा निवडणूक नायब तहसीलदार सचिन पाटील यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,निवडणुकीचे काम हे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे.निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. निवडणुकीच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा दिरंगाई होणार नाही,याची संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

निवडणूक प्रशिक्षणाला उपस्थित न राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेण्यात यावी. प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी यावेळी दिले.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान पथकांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.निवडणुकीसाठी नियुक्त मतदान पथके संबंधित तहसील कार्यालयातून रवाना होतील.या पथकांचे योग्य नियोजन करण्यात यावे.मतदान पथकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही,यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक असल्याने या मतदारसंघातील सर्व पात्र आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचविणे आवश्यक आहे. पदवीधर मतदार हे सुशिक्षित आणि जागरूक असल्यामुळे त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग अधिकाधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. मतदानाची तारीख,मतदानाची वेळ,मतदान केंद्रांची माहिती तसेच मतदान प्रक्रियेबाबत मतदारांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावेत,असे जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी सांगितले.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला महत्त्व असून,मतदानाचा हक्क बजावणे ही मतदारांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे,यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने जनजागृती करण्यावर भर द्यावा.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण,मतदान पथकांचे नियोजन,वाहन व्यवस्था,विविध परवानग्यांचे वितरण,कायदा व सुव्यवस्था,मतदान व्यवस्थापन, मतपत्रिकांची तपासणी व वाटप, अवैध मद्यवाटपास प्रतिबंध, प्रसारमाध्यमांशी संबंधित कामकाज,मतदान केंद्रांवरील मूलभूत सोयीसुविधा,स्ट्राँग रूम व्यवस्था,निवडणूक खर्च नियंत्रण, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कामकाज,टपाली मतपत्रिका आणि मतदार मदत कक्ष अशा विविध निवडणूकविषयक बाबींचा आढावा घेण्यात आला.

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या तयारीची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी बैठकीत दिली.तसेच उपस्थित सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांची आणि करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.

निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी,अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी बैठकीत दिल्या.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी बसवराज पुजारी यांची ५० हजार रुपयांची देणगी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देणगीदाराचा सत्कार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ५० हजार रुपयांची देणगी अर्पण…

    शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveआणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको – बँकांना निर्देश मुंबई -: राज्यातील आणखी चाळीस तालुके…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *