आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करा

Spread the love

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश

धाराशिव – सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि तातडीने तज्ञांच्या निगराणीखाली उपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालय शासनाने सुरू केले आहे. त्याठिकाणी रुग्णांना दिलासा देण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना कोणी वेठीस धरत असेल तर आपण हे कदापि सहन करणार नाही. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात उपद्रव माजविणाऱ्या समाजकंटकांचा तात्काळ कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हायलाच हवा अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला निर्देश दिले.

समाजकंटकाकडून त्रास होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. रुग्णालय परिसर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपद्रव माजविणाऱ्या या समाजकंटकांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांना दिल्या. यावेळी उपस्थित कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. उपस्थित करण्यात आलेल्या अडचणी दूर करण्याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या. या परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नील राठोड यांना निर्देश दिले. तसेच परिसरात सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविण्याबाबतही सांगितले.

यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही आवर्जून पाचारण करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता या सर्वांनी संयुक्तपणे आरोग्य शिबिर आयोजित करण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केली. महात्मा फुले जन आरोग्य व इतर आरोग्य योजनांच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त होणाऱ्या प्रती पूर्ती रकमेतून डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन देण्याबाबतही त्यांनी आवर्जून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांना सांगितले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर, डॉ. लाकाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड, बांधकाम विभागाचे अभियंता श्री. मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्य क्षेत्रातील मातृशक्तीचा महिला दिनानिमित्त सत्कार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या मातृशक्तीचा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यावेळी महिला डॉक्टर आणि विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि सत्कार करून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील उपअधिष्ठाता डॉ. उज्वला गवळी, प्रा.डॉ. पुष्पा अग्रवाल, प्रा.डॉ. चारुशीला हलगलकर, डॉ. आनंदवाडीकर, डॉ. मोनिका युनाती, डॉ. किरण देशमुख, डॉ. अनुजा कंदले, सहायक प्रा. डॉ. शितल पिसाळ, डॉ. क्षितिजा बनसोडे, डॉ. प्रीती घोरपडे, सुरक्षा रक्षक श्रीमती बाराते, लिपिक श्रीमती आशा राऊत, श्रीमती संगीता फड, श्रीमती भालेराव, श्रीमती गवई, श्रीमती गोरे, श्रीमती जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपणही केले.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *