
धाराशिव (प्रतिनिधी) – तालुक्यातील येडशी टोलनाक्याजवळ शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करीत असलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण व धक्काबुक्की प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना एका निवेदनाद्वारे दि.१७ नोव्हेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, येडशी टोलनाका येथे सोमवारी (दि.१६) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होते. यावेळी पत्रकार सागर जाधव, काकासाहेब कांबळे, वैभव पारवे यांना पोलिसांकडून मारहाण धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत पत्रकार जाधव, पारवे, जखमी झाले असून अन्य दोन माध्यम प्रतिनिधींनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक मोरे यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. या घटनेत सहभागी असलेल्या अन्य संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावरही कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी पोलीस निरीक्षक मोरे यांना चौकशीच्या कालावधीत संबंधित जबाबदारीतून दूर करावे. जखमी पत्रकार जाधव यांची वैद्यकीय तपासणी करून दुखापतीची अधिकृत नोंद घेण्या यावी आणि अन्य दोन माध्यम प्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्कीची दखल घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्या यावेत. घटनास्थळावरील उपलब्ध चित्रफिती, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवून पुरावे सुरक्षित ठेवावेत. तसेच भविष्यात पत्रकारांना वार्ताकन करताना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा, दबाव किंवा गैरवर्तन होणार नाही यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास पाठक, सचिव संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, शिला उंबरे, महेश पोतदार, चंद्रसेन देशमुख, मच्छिंद्र कदम, मल्लिकार्जुन सोनवणे, काकासाहेब कांबळे, कलीम सय्यद, शितल वाघमारे, पांडुरंग मते, अमजद सय्यद, कुंदन शिंदे, बालाजी निरफळ, बालाजी सुरवसे, श्रीराम क्षीरसागर, किशोर माळी,कैलास चौधरी, गणेश जाधव, किरण कांबळे, शिला उंबरे, सज्जन यादव, सलीम पठाण, अल्ताफ शेख, प्रशांत मते, शाहरुख सय्यद, प्रशांत गुंडाळे, वैभव पारवे, सुजित शिंदे, सागर जाधव यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.