
तब्बल ४५ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून १८ हजार १२४ मतांनी विजयी झाल्याची घोषणा झाली आणि विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या हस्ते निवडून आल्याचे प्रमाणपत्र स्वीकारले. त्या क्षणी मनात आनंदासोबतच माझ्यासाठी झटलेल्या असंख्य माणसांविषयी कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या.
अनेकांना हा विजय उमेदवारी मिळाल्यापासून गेल्या महिनाभरात घेतलेल्या अथक परिश्रमांचे फलित वाटेल. ते खरेही आहे; मात्र या विजयामागे गेल्या १४ वर्षांपासून लोकांमध्ये राहून जपलेली नाती, सुख-दुःखात दिलेली साथ आणि त्यातून निर्माण झालेला विश्वास आहे. पक्षीय भेद बाजूला ठेवून अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदतीचा हात दिला. त्या प्रत्येक हाताने या विजयाला बळ दिले.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन.राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते आमदार जयंतरावजी पाटील,प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश भैय्या टोपे आणि आमदार रोहितदादा पवार,युवक प्रदेशाध्यक्ष प्रवक्ता महेबूबभाई शेख पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री नरेंद्र काळे यांनी माझ्या उमेदवारीसाठी घेतलेले प्रयत्न, दिलेले पाठबळ आणि प्रचारातील साथ याबद्दल मनःपूर्वक आभार! मला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचाही मी मनापासून ऋणी आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीसाठी अनेक सहकारी इच्छुक होते. त्यामध्ये नांदेड येथील श्री. महेश देशमुख यांचाही समावेश होता. त्यांनी मोठ्या प्रमाणावर पदवीधर मतदार नोंदणी करून घेतली होती. त्यांच्या या मेहनतीबद्दल आणि योगदानाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदार नोंदणीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या योगदानाचीही मला जाणीव आहे.
माजी मंत्री अमित भैय्या देशमुख,बीडचे खा.बजरंग बप्पा सोनवणे,जालनाचे खा.कल्याण काळेसाहेब, नांदेडचे खासदार श्री. रविंद्र चव्हाण साहेब, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे साहेब,खा.आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी खासदार,आमदार,सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली मानून अहोरात्र परिश्रम घेतले. आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे यश शक्य झाले नसते.
या प्रवासात माझ्यासोबत पहाडाप्रमाणे उभे राहिलेले माझे लहान बंधू आमदार डॉ.राहुल पाटील व डॉ.उदयसिंह पाटील सर्व कुटुंबीय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले.त्यांच्यासोबतच मला आपल्या कुटुंबातील माणूस मानणारे विविध पक्षांतील कार्यकर्ते,सहकारी,मित्रपरिवार आणि हितचिंतक यांनीही जिवाचे रान केले. स्वतःचा थकवा, घरची जबाबदारी आणि सणवार बाजूला ठेवून माझ्यासाठी वेळ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
मतदारांपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता, मतदानाच्या दिवशी बूथवर जबाबदारी सांभाळणारा बूथप्रमुख आणि मतदान प्रतिनिधी, तसेच दीर्घ मतमोजणीत संयमाने व जागरूकतेने काम करणारा प्रत्येक मतमोजणी प्रतिनिधी—आपल्या मेहनतीची आणि निष्ठेची मला सदैव जाणीव राहील.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडणारे निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेही मनःपूर्वक आभार. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा देणाऱ्या आणि दूर राहूनही मनाने सोबत असलेल्या प्रत्येकाचे प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहे.
मराठवाड्यातील पदवीधर मतदार बंधू-भगिनींनो, आपण मताच्या रूपाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा आणि पदवीधरांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने काम करून हा विश्वास सार्थ ठरविण्याचा माझा निर्धार आहे.
आज प्रमाणपत्रावर माझे नाव आहे; पण या विजयावर आपल्या सर्वांच्या कष्टांची, प्रेमाची आणि विश्वासाची मोहोर आहे!
आपल्या विश्वासापुढे नतमस्तक… आपल्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध!
आपला,
डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील
नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ