सुरक्षित बालपणासाठी कायद्याचे कवच : कौडगाव व सांजा येथे विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षणाचे धडे

Spread the love

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सुरक्षित बचपन अभियानातून बालहक्क,पॉक्सो कायदा व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

‘गुड टच-बॅड टच’पासून ऑनलाइन फसवणुकीपर्यंत मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा,पालक आणि समाजाने एकत्र येण्याचे आवाहन

धाराशिव – शाळेच्या चार भिंतींमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे,तर स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्यही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे.बालपण सुरक्षित असेल, तरच उद्याची पिढी आत्मविश्वासाने उभी राहू शकेल हा संदेश देत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘सुरक्षित बचपन अभियाना’ अंतर्गत कौडगाव आणि सांजा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आज उत्साहात पार पडले.बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा पॉक्सो कायदा,बालविवाह प्रतिबंध,बालहक्क, सायबर सुरक्षा आणि स्वसंरक्षण अशा विविध विषयांवर न्यायाधीश,विधिज्ञ, पोलीस अधिकारी आणि बालकल्याण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.बालकांना कायद्याचे ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास,सुरक्षिततेची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध व्यक्त होण्याचे धैर्य निर्माण करणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

कौडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन पाचवे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,धाराशिव एस. एम.शेळवणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले.यावेळी उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सर्जे,सायबर कक्षाचे मकसुद काजी,बालकल्याण समितीचे सदस्य डी.टी.काळुके,कौडगावचे सरपंच दयानंद थोरात,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश थोरात आणि मुख्याध्यापक राजेश घोगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात ॲड.अभय पाथरूडकर यांनी ‘जागरूक बालपण,सशक्त भारत’ या संकल्पनेतून बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम,२०१२ अर्थात पॉक्सो कायद्याची सविस्तर माहिती दिली.बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी,बालकांचे अधिकार आणि अन्याय झाल्यास उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षणाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे यांनी ‘सुरक्षित क्लिक,सुरक्षित बालपण’ या विषयावर मार्गदर्शन करताना इंटरनेटचा जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.बदलत्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असताना विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी त्यांनी माहिती दिली.

बालकल्याण समितीचे सदस्य डी.टी. काळुके यांनी ना बालविवाह,ना बालशोषण’ या विषयावर मार्गदर्शन केले. बालकांना सुरक्षित वातावरणात जगण्याचा,शिक्षण घेण्याचा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.बालकल्याण समितीचे केस वर्कर अमर भोसले यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा,२००६ मधील महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट केल्या.

अध्यक्षीय समारोपात न्यायाधीश एस.एम.शेळवणे यांनी बालकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा,पालक आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेऊन सजग राहावे. बालकांचे शारीरिक,मानसिक आणि कायदेशीर संरक्षण करण्यासाठी कायदा सदैव त्यांच्या पाठीशी आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक विष्णू ढेरे यांनी केले,तर मुख्याध्यापक राजेश घोगडे यांनी आभार मानले.या शिबिरास शिक्षक,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांजा येथे ‘गुड टच-बॅड टच’ आणि स्वसंरक्षणाचे धडे
दरम्यान,जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा, सांजा येथेही ‘सुरक्षित बचपन अभियाना’अंतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश श्रीमती.भाग्यश्री पाटील,सहाय्यक दिवाणी न्यायाधीश श्रीमती.एस.व्ही.कुलकर्णी, सहाय्यक दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती.एस.एन.७ पिरजादे,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सर्जे,शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ सदस्य राकेश सूर्यवंशी आणि समुद्रवाणी बीटचे विस्तार अधिकारी पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे गुलाबाची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापिका शुभांगी सोनटक्के यांनी प्रास्ताविकातून अभियानाचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी न्यायाधीश श्रीमती.एस.व्ही. कुलकर्णी यांनी बाललैंगिक अत्याचार, त्यातून निर्माण होणारे धोके आणि त्यापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कोणत्याही प्रकारच्या अनुचित वर्तनाकडे दुर्लक्ष न करता त्याविषयी विश्वासू व्यक्तींकडे व्यक्त होण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

न्यायाधीश श्रीमती.एस.एन.पिरजादे यांनी ‘गुड टच-बॅड टच’ या संवेदनशील विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. चांगला आणि अयोग्य स्पर्श यातील फरक ओळखणे,स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सावध राहणे,आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाणे आणि गरज पडल्यास मदत मागणे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. मुलींची सुरक्षितता,सावधानता, आत्मविश्वास आणि जबाबदारी या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.

सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी ऑनलाइन माध्यमांतून होणारी विविध प्रकारची फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांची माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा.फेसबुक,इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घ्यावी.मोबाईल आणि इंटरनेटचा उपयोग प्रामुख्याने शैक्षणिक कारणांसाठी करावा,असे आवाहन त्यांनी केले.

शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ सदस्य राकेश सूर्यवंशी यांनी न्यायाधीशांनी स्वतः शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळेल आणि गावातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन प्रगती करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण द्या
न्यायाधीश भाग्यश्री पाटील

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थिनींचा उत्साह,सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. मुलींच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायद्याची माहिती पुरेशी नसून त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळांनी मुलींसाठी कराटे प्रशिक्षणासारखे उपक्रम राबवावेत.त्यामुळे मुलींमध्ये स्वसंरक्षणाची क्षमता, आत्मविश्वास आणि संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण होईल,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी १५१००,१०९८ आणि १९३० या महत्त्वाच्या मदत क्रमांकांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच पॉक्सो कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट करून बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर व्यवस्थेची जाणीव करून दिली.

विद्यार्थ्यांच्या नाटिकेतून सुरक्षित बालपणाचा प्रभावी संदेश
सांजा येथील कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘सुरक्षित बचपन’ विषयावरील नाटिका.बालकांची सुरक्षितता,बालसंरक्षण कायदा आणि अन्यायाविरुद्ध जागरूक राहण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी अभिनय व संवादातून प्रभावीपणे मांडला.कायद्याविषयीचे मार्गदर्शन केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी स्वतः नाटिकेतून त्याची अभिव्यक्ती केल्याने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळाली.

बालकांचे हक्क,सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण याबाबत जनजागृती करणारे ‘सुरक्षित बचपन अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.घोगरे यांनी केले,तर आर.एन.कदम यांनी आभार मानले.

कौडगाव आणि सांजा येथील या दोन्ही उपक्रमांतून विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख होण्याबरोबरच स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचा संदेश मिळाला. बालकांना सुरक्षित वातावरण देणे ही केवळ शासन,न्यायव्यवस्था किंवा शाळेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे,ही जाणीव या अभियानातून अधोरेखित झाली. बालकांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग आणि कायदेविषयक मार्गदर्शनाला मिळालेला प्रतिसाद यामुळे हे उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता सुरक्षित आणि सशक्त बालपणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

  • Related Posts

    दुष्काळाच्या संकटात बळीराजा एकटा नाही ; जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशीजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveचिंचपूर (ढगे) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद वीज,रोजगार,अतिवृष्टी अनुदान आणि सामाजिक सुरक्षा पेन्शनसाठी ग्रामस्थांनी मांडल्या मागण्या धाराशिव – आभाळाने साथ सोडली, शेतातील पिके संकटात सापडली आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर…

    धाराशिव तहसीलचे बळीराजा नवचेतना अभियान राज्यभरात राबवणार

    Spread the love

    Spread the loveमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा – अभियानाचा दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा आधार धाराशिव – धाराशिव तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेले बळीराजा नवचेतना अभियान आता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *