दुष्काळावर मात करण्यासाठी कौडगावच्या श्यामल राठोड यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग ; मातीविना हिरव्या चाऱ्याची निर्मिती

Spread the love

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी

  • कमी जागेत,कमी पाण्यात अवघ्या सात ते आठ दिवसांत पौष्टिक चारा
  • हायड्रोपोनिक चारा उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन
  • पशुपालकांसाठी ठरणार दिशादर्शक प्रयोग

धाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना कौडगाव येथील प्रयोगशील महिला शेतकरी श्यामल राठोड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आशेचा नवा मार्ग दाखविला आहे. शेतीसाठी मोठी जमीन नाही, मुबलक पाणीही नाही; तरीही जिद्द,कल्पकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर त्यांनी मातीविना हिरवा चारा तयार करण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे.हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या सात ते आठ दिवसांत पौष्टिक हिरवा चारा तयार करणाऱ्या त्यांच्या प्रकल्पाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी श्यामल राठोड यांचे विशेष कौतुक केले.

धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस, पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणे हे शेतकरी व पशुपालकांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.अशा परिस्थितीत कमी जागेत आणि अत्यल्प पाण्याचा वापर करून दर्जेदार व पौष्टिक चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.याच तंत्रज्ञानाचा अवलंब करून कौडगाव येथील श्यामल राठोड यांनी स्वतःच्या पुढाकारातून हायड्रोपोनिक चारा निर्मिती युनिट उभारले आहे.

या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी कौडगाव येथे भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दीपक मुळे,पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव पाटील आणि पशुधन विकास अधिकारी नाथबुवा उपस्थित होते.

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी हायड्रोपोनिक चारा निर्मिती प्रकल्पातील रॅकची रचना,चारा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रे,बियाणे रुजविण्याची प्रक्रिया, पाण्याचे नियोजन आणि सात ते आठ दिवसांत तयार होणाऱ्या हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता याबाबत सविस्तर माहिती घेतली.श्यामल राठोड यांनी प्रकल्पाची उभारणी, चारा उत्पादनाची पद्धत आणि प्रत्यक्ष कामकाजाची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी श्यामल राठोड यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करत कमी संसाधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध करण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे सांगितले.महिलांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचेही या पाहणीच्या निमित्ताने अधोरेखित झाले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून कमी जागेत अधिक प्रमाणात हिरवा चारा तयार करून जनावरांची दैनंदिन चाऱ्याची गरज भागविण्याच्या शक्यतांवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली.सध्या सुरू असलेल्या युनिटची उत्पादनक्षमता वाढवून त्याचे अधिक विस्तृत आणि व्यावसायिक स्वरूपातील युनिटमध्ये रूपांतर कसे करता येईल,याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडदळकर आणि उपस्थित तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

विशेषतः मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली रॅक व ट्रेची रचना, शेडनेटचे योग्य व्यवस्थापन, तापमान नियंत्रण,पाण्याचा काटकसरीने वापर आणि चारा उत्पादनातील सातत्य या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जनावरांना नियमितपणे पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती देण्यात आली.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत चारा तयार करण्यासाठी मातीची आवश्यकता नसते.विशिष्ट प्रकारच्या ट्रेमध्ये बियाण्यांची रुजवण करून नियंत्रित पाणीपुरवठा आणि योग्य वातावरणाच्या साहाय्याने हिरवा चारा तयार केला जातो. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत या पद्धतीत ९० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या भागातील पशुपालकांसाठी ही पद्धत विशेष उपयुक्त ठरू शकते

या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कमी जागेत चारा उत्पादन करता येते. घरासमोरील अंगण,उपलब्ध छोटी जागा किंवा शेडमध्ये बहुमजली रॅक उभारून त्यावर ट्रेच्या साहाय्याने चारा तयार करता येतो. बियाण्यांची रुजवण केल्यानंतर अवघ्या सात ते आठ दिवसांत हिरवा चारा तयार होतो.त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करण्याची आवश्यकता कमी होण्यास मदत होऊ शकते.
हायड्रोपोनिक पद्धतीने तयार होणाऱ्या हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने,जीवनसत्त्वे आणि एन्झाईम्ससारखे पोषक घटक असतात.योग्य प्रमाणात आणि संतुलित पशुआहाराचा भाग म्हणून या चाऱ्याचा वापर केल्यास जनावरांच्या पचनक्षमतेला मदत होऊ शकते.तसेच पशुधनाच्या पोषणात सुधारणा होऊन दुग्धोत्पादनासाठीही तो पूरक ठरू शकतो

हायड्रोपोनिक पद्धतीने तयार होणाऱ्या हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने,जीवनसत्त्वे आणि एन्झाईम्ससारखे पोषक घटक असतात. योग्य प्रमाणात आणि संतुलित पशुआहाराचा भाग म्हणून या चाऱ्याचा वापर केल्यास जनावरांच्या पचनक्षमतेला मदत होऊ शकते.तसेच पशुधनाच्या पोषणात सुधारणा होऊन दुग्धोत्पादनासाठीही तो पूरक ठरू शकतो.

या पद्धतीत मातीचा वापर होत नसल्यामुळे मातीशी संबंधित तण आणि काही कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.तयार झालेला हिरवा चारा मुळांसकट जनावरांना खायला देता येतो. त्यामुळे उपलब्ध चाऱ्याचा अधिकाधिक उपयोग करणे शक्य होते.मात्र,चारा उत्पादनादरम्यान स्वच्छता,योग्य तापमान,पाण्याचे व्यवस्थापन आणि चाऱ्याची गुणवत्ता राखणे आवश्यक असते.
धाराशिवसारख्या दुष्काळप्रवण जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी पाणी आणि जमिनीची उपलब्धता ही मोठी अडचण ठरते.पावसाचे प्रमाण कमी झाल्यास किंवा दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्यास हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते.अशा वेळी पशुपालकांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक पद्धतीने कमी पाण्यात आणि कमी जागेत हिरवा चारा तयार करण्याचा पर्याय पशुपालकांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.

विशेष म्हणजे,कौडगावच्या श्यामल राठोड यांनी प्रतिकूल परिस्थितीतही केवळ पारंपरिक शेती पद्धतींवर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी उभारलेला हा प्रकल्प इतर शेतकरी आणि महिला बचत गटांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.योग्य प्रशिक्षण,तांत्रिक मार्गदर्शन आणि नियोजनाच्या साहाय्याने अशा प्रकारचे चारा निर्मिती प्रकल्प इतर ठिकाणीही उभारण्याच्या शक्यता आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी,पशुपालक आणि महिला बचत गटांनी हायड्रोपोनिकसारख्या नाविन्यपूर्ण व आधुनिक चारा उत्पादन पद्धतींचा अभ्यास करावा.उपलब्ध जागा,पाणी,पशुधनाची संख्या आणि आर्थिक क्षमता लक्षात घेऊन अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन या पाहणी दौऱ्यादरम्यान करण्यात आले.

या प्रकल्पाच्या पाहणीवेळी स्थानिक ग्रामस्थ,शेतकरी आणि पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याची चिंता असताना कौडगावच्या श्यामल राठोड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारलेला हा प्रकल्प शेतीतील नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.कमी जागा, कमी पाणी आणि कमी कालावधीत हिरवा चारा तयार करण्याच्या या प्रयोगातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी नवे पर्याय उपलब्ध होऊ शकतात, हा सकारात्मक संदेश शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहोचत आहे.

  • Related Posts

    एन. व्ही. पी. शुगरची कामगारांना दिवाळीची मोठी भेट! कायम कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार बोनस; कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील महिलांना साडी-चोळी अन् मिठाईचे वाटप होणार

    Spread the love

    Spread the loveनव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसांच्या पगाराइतका बोनस धाराशिव प्रतिनिधी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि गोडव्याचा उत्सव! याच सणाच्या पार्श्वभूमीवर एन. व्ही. पी. शुगर प्रा.…

    दुःखाच्या छायेतही ३७ वर्षांची अन्नदान परंपरा अखंड!

    Spread the love

    Spread the loveकेतनच्या स्मृतींना उजाळा देत अग्रवाल परिवाराकडून पायी येणाऱ्या भाविकांची सेवा; ‘जस्टिस फॉर केतन’चा भावनिक संदेश तुळजापूर | सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा अग्रवाल परिवाराचा अन्नदान…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *