
धाराशिव – पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण होणारी पाणीटंचाई,घटती भूजल पातळी आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाची कामे आशेचा नवा किरण ठरत आहेत.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरावा,भूजलसाठ्यात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांच्या शिवारात बारमाही शेतीची आशा निर्माण व्हावी,या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाझर तलावाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.पालक सचिव डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर रोजी या कामाचा शुभारंभ झाला.

पालक सचिव डॉ.देशमुख हे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.या दौऱ्यादरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारात मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाझर तलावाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद मगर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे,उपअभियंता सायली जाधव,जीवन काकडे,ग्रामसेवक श्रीमती.खोपडे,कृषी सहायक श्री.होळकर तसेच शेतकरी ज्ञानेश्वर पारवे व नरसो पारवे यांची उपस्थिती होती.

५५ हेक्टर क्षेत्रातील पाझर तलाव ठरणार जलसंधारणासाठी महत्त्वपूर्ण
बसवंतवाडी शिवारात ५५ हेक्टर क्षेत्रात हा पाझर तलाव बांधण्यात येणार आहे.या तलावामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे.परिणामी,परिसरातील भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार असून,शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार आहे.
पाझर तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे साठविलेले पाणी जमिनीत हळूहळू मुरत असल्याने भूगर्भातील जलसाठ्याचे पुनर्भरण होते.त्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः पावसाचे प्रमाण कमी असलेल्या आणि वारंवार दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या भागांत अशा जलसंधारण प्रकल्पांना विशेष महत्त्व आहे.
शेतीला मिळणार पाण्याचा आधार ; उत्पादनवाढीला चालना
शेतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीत पावसाने ओढ दिल्यास पिकांची वाढ खुंटते,उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत पाझर तलावासारख्या जलसंधारणाच्या कामांमुळे शेतीला मोठा आधार मिळू शकतो.
बसवंतवाडी शिवारातील या पाझर तलावामुळे भूजल पुनर्भरण होऊन परिसरातील शेतीसाठी सिंचनाची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे.त्यामुळे पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शक्य होण्यास हातभार लागेल.तसेच संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास पिकांचे संभाव्य नुकसान कमी करणे,पीक उत्पादनात वाढ करणे आणि शेती अधिक शाश्वत बनविणे शक्य होणार आहे.पाण्याची उपलब्धता वाढल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करण्यासाठीही मदत होऊ शकते.परिणामी,शेतीची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळण्यास मदत होते.
भूजल पुनर्भरणामुळे परिसरातील जलस्रोतांना संजीवनी
पाझर तलाव हे केवळ पाणी साठविण्याचे साधन नसून भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त जलसंधारण संरचना आहे. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी तलावात साठवून ते जमिनीत मुरविल्यामुळे भूगर्भातील जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होते.याचा फायदा तलावाच्या परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांना होऊ शकतो.भूजल पातळी सुधारल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासही हातभार लागू शकतो.तसेच पावसाच्या पाण्याचा स्थानिक पातळीवर अधिकाधिक उपयोग करण्याच्या दृष्टीने अशा कामांचे महत्त्व मोठे आहे.
दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाला विशेष महत्त्व
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी अडविणे,पाणी जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर साठवून भूगर्भात मुरविण्यासाठी पाझर तलावासारखी कामे प्रभावी ठरू शकतात.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बसवंतवाडी येथे हाती घेण्यात आलेला हा पाझर तलाव भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि शेतीला अधिक सक्षम बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतात पाणी उपलब्ध असणे म्हणजे केवळ पिकांना जीवनदान मिळणे नव्हे,तर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा आधार मजबूत होणे होय. पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान, घटणारे उत्पादन आणि वाढणारी आर्थिक अनिश्चितता या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून जलसंधारणाच्या कामांकडे पाहिले जाते.
बसवंतवाडी शिवारातील पाझर तलावामुळे परिसरातील शेतीला सिंचनाचा आधार मिळण्याबरोबरच भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने पीक नियोजन करता येईल आणि त्यांच्या उत्पन्नवाढीलाही हातभार लागेल.
पालक सचिव डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेला या पाझर तलावाच्या कामाचा शुभारंभ हा बसवंतवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी जलसुरक्षा, शाश्वत शेती आणि आर्थिक समृद्धीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.