Spread the love

धाराशिव  ( प्रतिनिधी ): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज, धाराशिव यांच्या वतीने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी संपूर्ण धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातील मराठा समाजाचा वाढता पाठिंबा मिळत असून, आरक्षणाच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघासह विविध सामाजिक, व्यावसायिक व इतर घटकांना आवाहन पत्र देण्यात आले आहे.
३ सप्टेंबर रोजी व्यापारी, दुकानदार तसेच विविध घटकांनी आपापले व्यवसाय व व्यवहार बंद ठेवून जिल्हा बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जिल्ह्यातून व्यापक पाठिंबा देण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.