Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – सन २०२६ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात “हरित धाराशिव अभियान २.०” अंतर्गत तब्बल ३० लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून १४ ऑगस्ट २०२६ रोजी एकाच दिवशी, एकाच वेळी १२ तासांत १० लाखांहून अधिक रोपांची घनवन पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका, वनविभागाचे क्षेत्र तसेच लोकसहभागातून हा महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजनावर विशेष भर देण्यात आला असून, तालुकास्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांतील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आणि सजग नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.दरम्यान, हरित धाराशिव अभियान २०२५ अंतर्गत धाराशिव तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच धर्तीवर यंदाच्या “हरित धाराशिव अभियान २.०” मध्येही तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिंगोली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या सृजनात्मक, सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमात नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन सनियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.