जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

Spread the love

अकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.
बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. काही दिवसांपूर्वी हिवरखेड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना एक मुकबधिर बालक पालकांविना एकटाच हिंडताना आढळून आला. त्याला बालकल्याण समिती यांच्या आदेशानुसार शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले.

बालकाचा पत्ता व कुटुंबाचा शोध घेण्यासाठी बालकल्याण समितीने जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय मुकबधिर विद्यालयातील शिक्षिकांच्या मदतीने सांकेतिक भाषेद्वारे बालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यातून आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

त्यानंतर श्री. सुनील लाडूलकर यांनी बालकाची आधार नोंदणी केली. सुमारे 20 दिवसांनंतर आधार ग्राहक सेवा क्रमांक 1947 वर संपर्क साधला असता संबंधित नोंदणी डुप्लिकेट असल्यामुळे रद्द झाल्याची माहिती मिळाली. बालक हरवलेला व मुकबधिर असल्याने त्याचा पत्ता शोधण्यासाठी विशेष विनंती करण्यात आली. त्यानुसार ग्राहक सेवा केंद्राने तक्रार नोंदवून घेतली.

यानंतर सुमारे 15 दिवसांनी बालकाचा जुना आधार नोंदणी क्रमांक प्राप्त झाला. पुढील कार्यवाहीसाठी महा-आयटीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या माध्यमातून आवश्यक माहिती मुंबई येथील आधार नोंदणी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर बालकाचा आधार क्रमांक उपलब्ध झाला.

दि. 29 मे रोजी बालकाला तहसील कार्यालय, अकोला येथे नेण्यात आले. तेथील ऑपरेटर श्री. सतीश पडघन यांनी डोळ्यांचे स्कॅनिंग करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर बालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली. संबंधित बालकाचा पत्ता बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यातील मणियारी येथील असल्याचे निष्पन्न झाले.

आधार नोंदणीत नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर गुगलच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक मिळवून तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. पुढे संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांशी समन्वय साधून बालकाच्या पालकांचा संपर्क क्रमांक मिळविण्यात आला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे बालक व त्याच्या पालकांचा संपर्क घडवून आणण्यात आला. अनेक दिवसांनंतर एकमेकांना पाहून बालक व त्याचे पालक भावविव्हळ झाले.

त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि. 29 जुलै 2026 रोजी बालकाच्या वडिलांना अकोला येथे आले. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत बालकाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. लक्ष्मण हगवणे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य प्रांजली जैस्वाल, ॲड. शीला तोषणीवाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. राजू लाडूलकर, शासकीय बालगृहाच्या अधीक्षिका जयश्री हिवराळे, महेंद्र गणोदे तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चे सुनील सरकटे सतीश राठोड सुनील लाडूलकर चाईल्ड हेल्पलाईन आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईनचे रोहित भाकरे आणि स्वप्नील शिरसाट आशिष तऱ्हाळे उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री. सुनील लाडूलकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, विविध यंत्रणांशी प्रभावी समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरविलेल्या मुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे एका बालकाला पुन्हा आपल्या कुटुंबाचा आधार मिळाला.

  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *