
धाराशिव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे) यांचा ते जात असलेल्या मोटरसायकल व चारचाकी वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात इंगळे यांचा जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.९ मे रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील पेट्रोल पंपासमोर शिक्षक इंगळे हे आपल्या मोटरसायकलवरुन बेंबळी येथून आपल्या गावाकडे रस्ता ओलांडून जात होते. या दरम्यान शिवसेना (ठाकरे) चे बेंबळी शाखाप्रमुख दिनेश हेड्डा हे त्यांच्या चारचाकी (एमएच – २५ ए एस ७७७६) या वाहनातून धाराशिववरुन बेंबळी गावात जात होते. यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून आले. त्यांनी इंगळे यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शव विच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंगळे यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.