रस्ता सुरक्षा अभियान – अवयवदान जनजागृती ‘अवयवदान हे महादान’चा संदेश

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने दि.०१ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.त्याच अनुषंगाने आज २७ जानेवारी २०२६ रोजी आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे जिल्हा शल्य चिकित्सक,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालक व मालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, कार्यालयात आलेले शिकाऊ व पक्के लायसन उमेदवार तसेच सर्व नागरिकांसाठी अवयवदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.प्रशांतराव साळी यांनी उपस्थित उमेदवार व नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येतो.या अभियानाचा मुख्य उद्देश अपघातांचे प्रमाण कमी करणे त्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणे हा आहे.जिल्ह्यातही विविध ठिकाणी असे कार्यक्रम घेऊन नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. रक्तदानाप्रमाणेच अवयवदानासाठीही नागरिकांनी पुढे यावे,असे आवाहन त्यांनी केले.

श्री.साळी यांनी पुढे सांगितले की, अपघातातील व्यक्तींच्या अवयवदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो.अपघातग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईकांनी अवयवदानाचे महत्त्व समजून घ्यावे व त्यासाठी सहकार्य करावे,असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथील डॉ.विक्रम राठोड, डॉ.शिवाजी फुलारे व डॉ.अर्चना गुट्टे यांनी अवयवदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अवयवदान हे महादान असून जीवनापलीकडचे वरदान आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचे हृदय,यकृत,मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस,स्वादुपिंड,त्वचा,डोळे,हाडे आदी अवयव गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी देणे हा माणसाने करू शकणारा सर्वात निस्वार्थ व थोर उपकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योग्य अवयव न मिळाल्यामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात,तर अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत वेदनादायी जीवन जगतात. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवीन दृष्टी मिळू शकते.अवयवदानासाठी वय ही अट नसून अवयवांची गुणवत्ता महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.अवयवदानासाठी NOTTO (National Organ and Tissue Transplant Organization) यांच्या संकेतस्थळावर किंवा स्थानिक रुग्णालयात ऑर्गन डोनर कार्डसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.सर्व नागरिकांनी “अवयवदाता” बनण्याचा संकल्प करून अवयवदान म्हणजेच जीवनदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्री.अनिल खेमनार, श्रीमती पूनम पोळ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.कुणाल होले, श्री.महेबूब मुसा सय्यद,श्री.वाघ, अधिक्षक श्री.डी.के.लोंढे,श्री.नरसिंह कुलकर्णी,श्री.ए.आर.राऊत, श्री.बालाजी वाघमारे,श्री.रमेश कऱ्हाळे,श्रीमती संध्या राणी गवाड, करिष्मा लोहार तसेच शिपाई श्री. दत्तू सरपे,श्री.एस.जी.काळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. कुणाल होले यांनी आभार प्रदर्शन केले.

  • Related Posts

    रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.शाळेत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन १३ जानेवारी रोजी श्रीपतराव भोसले माध्यमिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *