रविवारी जिल्ह्यातील १५ हजार ८९१ असाक्षर देणार साक्षरतेची चाचणी

Spread the love

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन

    १० हजार ९९४ महिलांसह ४ हजार ८९७ पुरुषांचा सहभाग

    वयाच्या पंधराव्या वर्षानंतरही शिक्षणाची नवी संधी

    नवसाक्षरांना मिळणार केंद्र शासनाचे प्रमाणपत्र

    धाराशिव – शिक्षणाची संधी हुकली, म्हणून शिकण्याची उमेद संपत नाही.आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर अक्षरांची ओळख करून घेता येते आणि ज्ञानाच्या बळावर आत्मविश्वासाने पुढे जाता येते,हाच संदेश देणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत जिल्ह्यात रविवारी,२५ ऑक्टोबर २०२६ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीसाठी जिल्ह्यातील १५ हजार ८९१ असाक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात आली असून, त्यामध्ये १० हजार ९९४ महिला आणि चार हजार ८९७ पुरुषांचा समावेश आहे.विशेष म्हणजे या चाचणीत महिलांचा सहभाग लक्षणीय असून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) नागेश मापारी यांनी दिली.

    देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता विकसित करणे,त्यांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाची ओळख करून देणे,तसेच दैनंदिन जीवनातील व्यवहार आत्मविश्वासाने करण्यास सक्षम बनविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.विविध कारणांमुळे औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

    वाचन आणि लेखनाची कौशल्ये आत्मसात केल्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहार अधिक सुलभ होतात.स्वतःचे नाव लिहिणे,आवश्यक माहिती वाचणे, साधे हिशेब करणे आणि विविध सेवांचा लाभ घेताना आवश्यक बाबी समजून घेणे यांसारख्या गोष्टींसाठी साक्षरता महत्त्वाची ठरते.त्यामुळे केवळ अक्षरओळख करून देणे एवढ्यापुरताच हा उपक्रम मर्यादित नसून,असाक्षर व्यक्तींना स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

    या मूल्यांकन चाचणीसाठी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रे सुरू राहणार आहेत.प्रत्यक्ष चाचणीचा कालावधी तीन तासांचा असेल.दिव्यांग परीक्षार्थींना चाचणी सोडविण्यासाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनाही आवश्यक सवलतीसह या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

    ही चाचणी एकूण १५० गुणांची असून,त्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. भाग ‘क’मध्ये वाचनासाठी ५० गुण, भाग ‘ख’मध्ये लेखनासाठी ५० गुण आणि भाग ‘ग’मध्ये संख्याज्ञानासाठी ५० गुण असतील.अशा प्रकारे तिन्ही घटकांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन केले जाणार आहे.

    या चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात स्वतंत्रपणे किमान ३३ टक्के म्हणजेच १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एकूण १५० गुणांपैकी किमान ३३ टक्के म्हणजेच ५१ गुण मिळविणे अनिवार्य आहे. कोणत्याही एका भागात आवश्यक गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास नियमानुसार जास्तीत जास्त पाच कृपागुण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे मूल्यमापन करताना निर्धारित निकषांनुसार परीक्षार्थींच्या कामगिरीचा विचार केला जाणार आहे.

    या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध भाषांमधून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी,उर्दू, हिंदी,गुजराती,इंग्रजी,कन्नड, तेलगू,तमिळ आणि बंगाली आदी भाषांमधून ही चाचणी घेण्यात येणार आहे. संपूर्ण चाचणी ऑफलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे परीक्षार्थींना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आ

    ज्या असाक्षर व्यक्तींची ‘उल्हास’ ॲपवर अद्याप ऑनलाइन नोंदणी झालेली नाही,अशा व्यक्तींनाही या चाचणीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधित व्यक्तींना चाचणीच्या दिवशीही नोंदणी करून परीक्षा देता येणार आहे.त्यामुळे नोंदणीअभावी कोणतीही इच्छुक असाक्षर व्यक्ती या संधीपासून वंचित राहू नये,यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

    यू-डायस क्रमांकानुसार नोंदणी झालेली प्रत्येक शाळा हेच परीक्षा केंद्र असणार आहे.त्यामुळे संबंधित परिसरातील परीक्षार्थींना नोंदणीकृत शाळांमध्ये जाऊन चाचणी देता येणार आहे.परीक्षेसाठी उपस्थित राहताना प्रत्येक परीक्षार्थीने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो नोंदणी अर्जावर लावणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ओळख पटविण्यासाठी मतदान ओळखपत्र,आधार कार्ड,पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

    या मूल्यांकन चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक देण्यात येणार आहे. त्यामुळे वाचन,लेखन आणि संख्याज्ञानाची कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची अधिकृत मान्यता मिळणार आहे.आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षणापासून दूर राहिलेल्या व्यक्तींसाठी हे प्रमाणपत्र त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

    जिल्ह्यातील सर्व पात्र असाक्षर व्यक्तींना या मूल्यांकन चाचणीत सहभागी करून घेण्यासाठी शाळा,मुख्याध्यापक, शिक्षक,केंद्रप्रमुख,सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.विशेषतः ग्रामीण भागातील तसेच विविध कारणांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या व्यक्तींना चाचणीची माहिती देऊन त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.साक्षरतेच्या या मोहिमेत लोकसहभाग वाढल्यास अधिकाधिक व्यक्तींना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

    उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या नियामक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,कार्यक्रमाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सचिव नागेश मापारी यांनी या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.

    साक्षरता ही केवळ अक्षरओळख नसून आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक प्रगतीचा पाया आहे.त्यामुळे रविवारी होणारी ही चाचणी जिल्ह्यातील १५ हजार ८९१ व्यक्तींसाठी आपल्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे.सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून ही चाचणी यशस्वी करावी आणि पात्र असाक्षर व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    एन. व्ही. पी. शुगरची कामगारांना दिवाळीची मोठी भेट! कायम कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार बोनस; कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील महिलांना साडी-चोळी अन् मिठाईचे वाटप होणार

    Spread the love

    Spread the loveनव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसांच्या पगाराइतका बोनस धाराशिव प्रतिनिधी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि गोडव्याचा उत्सव! याच सणाच्या पार्श्वभूमीवर एन. व्ही. पी. शुगर प्रा.…

    दुःखाच्या छायेतही ३७ वर्षांची अन्नदान परंपरा अखंड!

    Spread the love

    Spread the loveकेतनच्या स्मृतींना उजाळा देत अग्रवाल परिवाराकडून पायी येणाऱ्या भाविकांची सेवा; ‘जस्टिस फॉर केतन’चा भावनिक संदेश तुळजापूर | सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा अग्रवाल परिवाराचा अन्नदान…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *