ग्रंथयादीवरील सूचना,हरकती व आक्षेप नोंदविण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत
- मराठीतील ६८५,हिंदीतील २४६ आणि इंग्रजीतील २५२ ग्रंथांचा समावेश
प्रभारी ग्रंथालय संचालक यांचे आवाहन
धाराशिव – राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दर्जेदार आणि विविध विषयांवरील ग्रंथ उपलब्ध व्हावेत,वाचनसंस्कृतीला चालना मिळावी आणि वाचकांना समृद्ध साहित्याचा लाभ घेता यावा,या उद्देशाने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी एकूण १ हजार १८३ ग्रंथांची निवड करण्यात आली आहे.या ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून,संबंधित ग्रंथांबाबत सूचना,हरकती किंवा आक्षेप असल्यास ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावेत,असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ५१ वी ग्रंथभेट योजना राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या आणि ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी एकूण १ हजार १८३ ग्रंथांची निवड केली आहे.
निवड करण्यात आलेल्या ग्रंथांमध्ये मराठी भाषेतील ६८५,हिंदी भाषेतील २४६ आणि इंग्रजी भाषेतील २५२ ग्रंथांचा समावेश आहे.विविध भाषांमधील ग्रंथांचा या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचकांना विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
ग्रंथालय संचालनालयाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार,निवड झालेल्या सर्व १ हजार १८३ ग्रंथांची यादी १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नागरिक,प्रकाशक,लेखक आणि संबंधित घटकांच्या अवलोकनासाठी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर खुली ठेवण्यात आली आहे.
या ग्रंथयादीतील ग्रंथांचे वितरण ग्रंथालय संचालनालयाच्या २५ टक्के ग्रंथसूटदरानुसार करणे बंधनकारक असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना,हरकती किंवा आक्षेप असल्यास संबंधितांनी ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन,मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर लेखी स्वरूपात सादर करावेत. सूचना किंवा हरकती कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हस्तबटवड्याने अथवा टपालाद्वारे पाठविता येतील.तसेच director.dol@maharashtra.gov.in या अधिकृत ई-मेल पत्त्यावरही सूचना,हरकती आणि आक्षेप पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे,प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथयादीतील ग्रंथांचे नाव, लेखकाचे नाव,प्रकाशकाचे नाव किंवा ग्रंथांची किंमत यामध्ये काही बदल अथवा दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहितीही संचालनालयास कळविता येणार आहे.अशा स्वरूपाच्या सूचना स्वागतार्ह असल्याचे ग्रंथालय संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
ग्रंथयादीतील माहिती अचूक राहावी आणि ग्रंथनिवड प्रक्रियेत संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी,या दृष्टीने सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.मात्र,३१ ऑक्टोबर २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या सूचना,हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.त्यामुळे संबंधितांनी निर्धारित मुदतीतच आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन,मुंबई – ४०० ००१ येथे संपर्क साधता येईल. तसेच दूरध्वनी क्रमांक (०२२) २२६६४६३८ किंवा २२६७१३३३ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येणार आहे.ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निवड झालेल्या ग्रंथांची यादी अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथयादीचे संबंधित लेखक,प्रकाशक,ग्रंथालय पदाधिकारी,ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी अवलोकन करावे. ग्रंथांचे नाव,लेखक,प्रकाशक किंवा किंमत याबाबत काही बदल निदर्शनास आल्यास अथवा अन्य सूचना,हरकती किंवा आक्षेप असल्यास ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संचालनालयाकडे पाठवावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.