


धाराशिव – प्राचीन लेणींमधून उलगडणारा हजारो वर्षांचा इतिहास, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा,नळदुर्ग- परंड्यासारख्या भुईकोट किल्ल्यांचा दिमाख आणि तेरसारख्या प्राचीन नगरीचा सांस्कृतिक वारसा अशा इतिहास,अध्यात्म,संस्कृती आणि पर्यटनाच्या समृद्ध पदरांनी धाराशिव जिल्ह्याची ओळख घडली आहे.या वैभवशाली वारशाचे जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील संरक्षित स्मारके व पर्यटनस्थळांच्या विकासाला आता नियोजनबद्ध चालना दिली जात आहे. जिल्ह्याच्या या पर्यटन- सांस्कृतिक वैभवाचा आलेखही अधोरेखित होत आहे.



धाराशिव हा मराठवाड्यातील प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे.जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ‘उस्मानाबाद’ होते.प्राचीन काळापासून ‘धाराशिव’ या नावाने हा भाग ओळखला जात असल्याचे अनेक शिलालेखांमधील उल्लेखांतून स्पष्ट होते.राष्ट्रकूट काळात सातव्या-आठव्या शतकात या परिसराला विशेष महत्त्व होते. जिल्ह्याचा बहुतांश भाग पठारी असून एकूण क्षेत्रफळ ७ हजार ५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी २४१ चौरस किलोमीटर क्षेत्र शहरी आहे.हा ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठी ताकद ठरत आहे.
२९ स्मारकांत दडला जिल्ह्याचा इतिहास
ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या जडणघडणीत येथील भौगोलिक,ऐतिहासिक,सामाजिक, राजकीय,धार्मिक आणि सांस्कृतिक योगदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने जिल्ह्यातील एकूण २९ स्मारके राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित केली आहेत.त्यामुळे या वास्तू केवळ इतिहासाच्या खुणा न राहता नव्या पिढीला आपल्या समृद्ध वारशाशी जोडणारे आणि पर्यटनाला बळ देणारे महत्त्वाचे दुवे ठरत आहेत.



या संरक्षित स्मारकांमध्ये धाराशिव लेणी,चामर (चांभार) लेणी,शिवगुरू समाधी मंदिर,हजरत समशुद्दीन दर्गा,तेर येथील त्रिविक्रम मंदिर,उत्तरेश्वर मंदिर,संत गोरोबा काकांचे घर,तीर्थकुंड,तसेच स्तुप व प्रागैतिहासिक स्थळ,किसन मस्के यांचे शेत,प्रागैतिहासिक स्थळ गोविंद लक्ष्मण चारी यांचे शेत,गोविंद माधव लक्ष्मण चारी यांचे शेत,बैराग पांढर,सुलेमान टेकडी, रेणुका टेकडी,गोदावरी टेकडी,कोटक्षेत्र, महार टेकडी आणि मुलान टेकडी यांचा समावेश आहे.वडगाव येथील प्रागैतिहासिक (महाअश्मकालीन) स्थळ,जागजी येथील महालक्ष्मी मंदिर व बारव, तुळजापूरचे भवानी मंदिर व लावणी घुमट,नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला,परंडा किल्ला,माणकेश्वरचे महादेव मंदिर,परंडा तालुक्यातील शेंद्री (बु.) येथील प्रागैतिहासिक (महाअश्मकालीन) स्थळ (शीलावर्तुळ),मुरूम येथील हिंदू मंदिर व शिलालेख,उमरग्याचे महादेव मंदिर आणि सास्तूर येथील घुमट यांचाही या संरक्षित वारशात समावेश आहे.
श्रद्धेच्या वाटेवर पर्यटनाची नवी संधी
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक.कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक येतात.त्याचबरोबर तेर येथील संत गोरोबा काकांचा वारसा,जागजीचे महालक्ष्मी मंदिर,माणकेश्वरचे महादेव मंदिर,उमरगा व मुरूम येथील प्राचीन धार्मिक वास्तू या जिल्ह्याच्या तीर्थपर्यटनाची व्याप्ती अधिक व्यापक करतात.नळदुर्ग व परंड्याचे किल्ले इतिहासप्रेमींना साद घालतात,तर धाराशिवच्या लेण्या प्राचीन स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. या सर्व स्थळांना परस्परपूरक पर्यटन साखळीत जोडल्यास जिल्ह्यातील तीर्थपर्यटनाबरोबरच ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची क्षमता आहे.
पर्यटनाचा विकास म्हणजे केवळ एखाद्या स्थळाचे सुशोभीकरण नव्हे.भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढली की स्थानिक वाहतूक,निवास,भोजन,प्रसाद-
विक्रेते,हस्तकला,लघुव्यवसाय,बचतगट आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात.त्यामुळे वारशाचे संवर्धन आणि पर्यटनस्थळांवरील पायाभूत सुविधांचा विकास हा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ देणारा ठरू शकतो.
पाच पर्यटनस्थळांवरील विकासकामे सुरू
जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत गड-किल्ले,मंदिरे आणि महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांचे संवर्धन करण्यासाठी १४ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.या निधीतून जिल्ह्यातील पाच पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे सुरू असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली आहे.
यामध्ये तुळजापूर येथील घाटशीळ मंदिर,वडगाव (देव) येथील खंडोबा मंदिर,धाराशिव लेणी,चामर लेणी आणि नळदुर्ग किल्ला (भाग-२) या स्थळांचा समावेश आहे. ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप आणि महत्त्व जपत त्यांचे संवर्धन झाल्यास भाविक व पर्यटकांसाठी ही स्थळे अधिक आकर्षक ठरणार आहेत.
आणखी तीन स्थळांच्या विकासाचा प्रस्ताव
पर्यटन विकासाची ही वाटचाल पुढे नेत उपळा येथील त्रिकुटेश्वर मंदिर,तेर येथील मुलानी टेकडी आणि धाराशिव येथील शिवगुरू समाधी या तीन स्थळांच्या विकासाची कामे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधी योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत.ही कामे प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्यातील आणखी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्यास मदत होणार आहे.
वारसा जपला तर पर्यटनही बहरणार
धाराशिवची खरी पर्यटनशक्ती तिच्या विविधतेत दडलेली आहे. एका बाजूला तुळजाभवानी मातेचे श्रद्धास्थान,दुसरीकडे नळदुर्ग- परंड्याचे इतिहास सांगणारे किल्ले,कुठे प्राचीन लेण्या,तर कुठे संत गोरोबा काकांच्या स्मृती जपणारे तेर.या सर्व स्थळांचे शास्त्रीय संवर्धन, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि प्रभावी प्रसिद्धी यांची सांगड घातली तर धाराशिव जिल्हा राज्यातील महत्त्वाचा तीर्थ,इतिहास आणि सांस्कृतिक पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून अधिक सक्षमपणे पुढे येऊ शकतो.स्मारकांचे संवर्धन म्हणजे केवळ दगड-मातीच्या वास्तूंची निगा राखणे नाही,तो आपल्या इतिहासाशी असलेला जिवंत संवाद जपण्याचा प्रयत्न आहे.आज या वारशाला पर्यटन विकासाची जोड मिळत असल्याने भाविकांना सुविधा,पर्यटकांना इतिहासाचा अनुभव आणि स्थानिकांना रोजगार- व्यवसायाच्या संधी अशी विकासाची नवी साखळी निर्माण होण्याची आशा आहे.वारसा जपूया,पर्यटन वाढवूया’ हा दृष्टिकोन धाराशिवच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देऊ शकतो.