१० ते १७ सप्टेंबरपर्यंत पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे
धाराशिव – कुणबी,मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदी असलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र सुलभपणे उपलब्ध व्हावे आणि त्यासाठी त्यांना अनावश्यक धावपळ करावी लागू नये,यासाठी उमरगा तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंडळ स्तरावर १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष शिबिरे घेण्यात येणार आहे.
महसूल मंडळस्तरावर कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांसाठी या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.शिबिरांमध्ये नागरिकांच्या उपलब्ध महसुली अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधणे, जुन्या अभिलेखांतील पुराव्यांची पडताळणी करणे,अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ होण्यास मदत होणार आहे.
उमरगा तालुक्यातील दाळींब, नारंगवाडी,मुरूम,मुळज,उमरगा, बलसूर व बेडगा या महसूल मंडळांच्या कार्यक्षेत्रात संबंधित मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,ग्राम विकास अधिकारी आणि कृषी सहायक यांच्या समन्वयाने या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विशेष शिबिरांची तारीख,वेळ आणि ठिकाण याबाबतची माहिती संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत नोटीस बोर्ड,दवंडी तसेच स्थानिक WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या गावातील शिबिराच्या निश्चित वेळ व ठिकाणाची माहिती स्थानिक पातळीवर जाणून घ्यावी.
तालुक्यातील ज्या नागरिकांकडे कुणबी,मराठा-कुणबी अथवा कुणबी-मराठा नोंदी किंवा त्यासंबंधीचे पुरावे उपलब्ध आहेत किंवा ज्यांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे,त्यांनी संबंधित महसूल मंडळाच्या विशेष शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.उपलब्ध अभिलेख आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्रासाठी पुढील आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि पात्र नागरिकांना शासनाच्या या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा,या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी,उमरगा आणि तहसीलदार,उमरगा यांनी केले आहे.