मान्सून २०२६ पूर्व तयारी आढावा बैठक
- मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
- विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित
- १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार


धाराशिव – सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सराव आयोजित करावेत.विशेषतः तहसीलदार व नगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन सराव घेताना संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष वापर करावा.पाळीव जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्यात यावे.तसेच गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अतिवृष्टीऐवजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कोणती पर्यायी पिके घ्यावीत,याचे नियोजन आतापासूनच करावे.आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून २०२६ पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होते.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,तलावांवर संबंधित विभागाचे नाव,अधिकाऱ्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असलेले फलक लावण्यात यावेत.त्यामुळे संबधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी यांना संबंधित अधिकाऱ्यांशी वेळीच संपर्क साधता येईल.आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच धोक्याची सूचना देणारे बोर्ड उभारावेत.आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या आणि पोहणाऱ्या व्यक्तींची यादी तयार ठेवावी.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपत्तीच्या काळात दिरंगाई केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकणारे वाकलेले पोल, लोंबकळणाऱ्या तारा व धोकादायक वीज यंत्रणेचे सर्वेक्षण करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.