Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

2 फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली.

सेवेची तब्बल 35 वर्षे पूर्ण करून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय कुलकर्णी 2 फेब्रुवारी रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे,निष्ठेने व समर्पित भावनेने आपली जबाबदारी पार पाडली.अशा निष्ठावान कर्मचाऱ्याचा सन्मान हा केवळ औपचारिक न राहता,मनापासूनचा असावा,याचे जिवंत उदाहरण 2 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळाले.सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सायंकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी एक अत्यंत भावस्पर्शी निर्णय घेतला.स्वतःच्या शासकीय वाहनात,श्री.कुलकर्णी साहेबांना स्वतःच्या जागेवर बसवून,स्वतः मात्र समोर सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बसून त्यांना घरी सुखरूप पोहोचवले आणि त्यानंतरच आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.

हा केवळ एक प्रसंग नव्हता,तर अधिकारी–कर्मचारी नात्यातील जिव्हाळा, प्रामाणिकपणाला मिळालेली माणुसकीची पावती आणि नेतृत्व म्हणजे काय याचा आदर्श ठरलेला क्षण होता.अधिकारी असूनही कर्मचाऱ्यांवर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करणारे,त्यांच्या कार्याचा आदर करणारे आणि माणुसकी जपणारे जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार अनेकांच्या मनात आदराने घर करून गेले.अशा संवेदनशील,माणुसकीने भरलेल्या नेतृत्वाला मनापासून वंदन…