मुख्य बसस्थानकाला ‘श्री तुळजाभवानी’ तर जुन्या बसस्थानकाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव
धाराशिव – आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तुळजापूर येथील मुख्य बसस्थानकाचे ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’ आणि नूतनीकरण झालेल्या जुन्या बसस्थानकाचे ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यासोबतच, यात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५० नव्या ‘लालपरी’ बसेसही सेवेत दाखल झाल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी बसस्थानकांच्या नामकरणासाठी परिवहन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकाराने या दोन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत.
नवीन बसेस प्रमुख मार्गांवर धावणार
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना वेळेवर सेवा देण्यासाठी ५० नवीन बसेस तुळजापूर आगारात दाखल झाल्या आहेत. या बसेस घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत धावणार आहेत.
तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव, तुळजापूर-लातूर आणि तुळजापूर-कोल्हापूर या प्रमुख मार्गांवर या बसेसच्या दररोज सुमारे २०० फेऱ्या होणार आहेत.
नवरात्र यात्रा काळात तुळजापूरमध्ये देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची प्रवासातील गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले आहेत. या नव्या सुविधांमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
