Spread the love

मुंबई  -: राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नुतनीकरण करताना आकारले जाणारे शुल्क आता पूर्णपणे निःशुल्क करण्यात आले आहे.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने आज (१३ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, यापूर्वी बांधकाम कामगारांकडून नोंदणी व नुतनीकरणासाठी रु. २५ शुल्क आकारले जात होते. शासनाच्या २०२२ मधील आदेशानुसार ते कमी करून रु. १ करण्यात आले होते. मात्र, बांधकाम कामगारांच्या मागण्या आणि मंडळाच्या शिफारसी लक्षात घेऊन आता हे शुल्कही रद्द करून नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे शुल्कमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाच्या कल्याणकारी योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यातील नोंदणीकृत व सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांसाठी मंडळामार्फत २९ विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर योजनांचा समावेश आहे.