स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात आरोग्य तपासणी व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

Spread the love

धाराशिव – दि. 17 जुलै, 2025 रोजी तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह संलग्न शाळा, विमानतळ रोड, अळणी, ता. जि. धाराशिव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव व शासकीय रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात व अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. किर्ती किरण पुजार साहेब (जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती. भाग्यश्री का. पाटील मॅडम (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव) या होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीमती. डॉ. मृणाल जाधव मॅडम (तहसीलदार धाराशिव), मा. ऍड. श्री. अमोल वरुडकर सर (अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव), मा. ऍड. श्री. अमोल गुंड (मुख्य न्याय रक्षक धाराशिव), मा. ऍड. श्री. शुभम गाडे सर (सहाय्यक न्याय रक्षक धाराशिव), श्रीमती. ऍड. तेजश्री पाटील मॅडम, सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सोनटक्के सर, मा. डॉ. श्रीमती. मिटकरी मॅडम (स्त्रीरोग तज्ज्ञ), श्री. बलराम पोद्दार (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता), श्रीमती. खटिंग मॅडम (सायकॅट्रिक नर्स, शासकीय रुग्णालय धाराशिव), श्री. सुहास शिंदे (मानसोपचार तज्ञ, शासकीय रुग्णालय धाराशिव) तसेच शासकीय रुग्णालयाच्या इतर वैद्यकीय पथकाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बालगृहाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व मतिमंदत्वाचे जनक जीन मार्क इटार्ड यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमाची संकल्पना अधोरेखित करणाऱ्या “खरा तो एकचि धर्म” या गीतावर बालगृहातील मुलींनी सादर केलेले नृत्य पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.
यानंतर बालगृहातील मुलींनी आपल्या कलेचा उत्कृष्ट प्रत्यय देत मान्यवरांचे स्वागत धाराशिव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्री. कौस्तुभ दिवेगावकर साहेब यांचे स्वलिखित “मराठवाडा मुक्ती संग्राम” हे पुस्तक व औषधी रोपे देऊन केले. त्यानंतर मुलींनी स्वागतगीत सादर करत कार्यक्रमात एक चैतन्यमय ऊर्जा निर्माण केली.
संस्थेचे सचिव मा. श्री. शहाजी चव्हाण सर यांनी प्रास्ताविकेतून संस्थेचे कार्य व उपस्थितांना बालगृहातील मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या पुढील सत्रात मा. ऍड. श्री. शुभम गाडे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या 2024 मधील बौद्धिक व मानसिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींकरिता असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. मा. ऍड. श्री. अमोल गुंड यांनी “बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012” या कायद्याचे महत्त्व विशद केले. मा. ऍड. श्री. अमोल वरुडकर सर यांनी “बालकांचे अधिकार व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015” या विषयावर सखोल माहिती दिली.
यानंतर मा. श्रीमती. डॉ. मृणाल जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासकीय योजनांचा लाभ बालगृहातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.मुलींच्या कलागुणांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
मा. श्री. किर्ती किरण पुजार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बालगृहातील मुलींच्या स्वावलंबनासाठी त्यांच्या हातांनी तयार केलेल्या राख्या, गणपती मूर्ती व इतर हस्तकलांच्या वस्तूंचे सादरीकरण व विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.तसेच बालगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यासाठी स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले.त्यांनी बालगृहातील कर्मचारी आणि मुलींच्या समर्पित कार्याचे मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मा. श्रीमती. भाग्यश्री पाटील मॅडम यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने बालगृहातील सर्व दिव्यांग मुलींना शासकीय योजनांचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे सांगितले. बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि निःस्वार्थी कार्याचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
या विशेष कार्यक्रमाअंतर्गत बालगृहातील सर्व दिव्यांग मुलींची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सायकॅट्रिक नर्स व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध आरोग्य निकषांवर आधारित तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. श्रीमती मोहिनी शिरुरे मॅडम यांनी प्रभावीपणे केले तर श्रीमती. कांबळे रूपाली (मानसोपचार तज्ञ) यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

  • Related Posts

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) -: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी ११:४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जनता…

    युवकांसाठी सुवर्णसंधी! खादी मंडळाच्या योजनांनी गावातच मिळवा रोजगार.

    Spread the love

    Spread the loveतुमच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे? गावात उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे? मग सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजना तुमच्यासाठीच आहेत.या योजनांतून विनातारण कर्ज, टूलकिट, प्रशिक्षण आणि लाखोंचे अनुदान…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *