
धाराशिव | धाराशिव जिल्ह्याने आज इतिहास रचला! ‘हरित धाराशिव अभियान’ अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेने जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १५ लाख वृक्षांची लागवड करून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव अजरामर केले. हा मान मिळवणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून धाराशिवचा लौकिक देशभरात गेला आहे.
या अभूतपूर्व उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते शिंगोली (ता. धाराशिव) येथील वनविभागाच्या पाच हेक्टर क्षेत्रावर वृक्षदिंडी आणि वृक्ष लागवड करून झाला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, सिनेअभिनेते स्वप्नील जोशी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले, “झाडे लावणे नाही, तर ती जगवणे महत्त्वाचे आहे. ही झाडे मी स्वतः पाहण्यासाठी जिल्ह्यात भेट देईन. धाराशिवचं वनराई क्षेत्र नंदनवन करण्यासाठी २५ कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करावा लागला, तरी शासन मागे हटणार नाही.”
या अभियानाची पुढील टप्प्यात ४० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य असून उर्वरित २५ लाख वृक्ष लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांना त्यांच्या नेतृत्वाखालील अथक प्रयत्नाबद्दल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डचे सन्मानचिन्ह आणि मेडल्स देण्यात आले.
हायलाइट्स:
एकाच दिवशी १५ लाख झाडांची लागवड
महाराष्ट्रात प्रथमच रेकॉर्ड धाराशिवच्या नावावर
गिनीज रेकॉर्डकडे वाटचाल सुरू
वृक्षदिंडी, दीपप्रज्वलन, जनसहभागातून उत्सव