
धाराशिव जिल्ह्यात लवकरच सुरू होणार हरित ऊर्जा निर्मिती
धाराशिव (प्रतिनिधी ): रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीच्या निकषांमध्ये महाराष्ट्र राज्य तब्बल पाचव्या क्रमांकावर असल्याचे सर्वेक्षणाअंती दिसून आले आहेत. प्रगतिशील राज्याच्या ऊर्जा सक्षमतेच्या दृष्टीने हे सर्वेक्षण डोळ्यात अंजन घालणारे आहे.३१ मार्च २०२४ पर्यंतच्या सर्वेक्षणानुसार हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या अगोदर रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षमता निकषांच्यामध्ये गुजरात,तमिळनाडू,राजस्थान,कर्नाटक ही राज्य अग्रस्थानी आहेत. सद्य परिस्थितीत महाराष्ट्राला रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीत अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्यातील झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या घडामोडींमुळे वीज वापराच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु अक्षय ऊर्जा प्रकारासह पारंपारिक ऊर्जा निर्मितीच्या निकषांच्या मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी येतो. या निकषात देखील गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे. एकत्रित ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्रात ५१ गिगा वॅट
तर गुजरात मध्ये ५८ गिगावॅट इतकी वीज निर्मिती होते. दिवसागणित वाढणाऱ्या विजेच्या वापरामुळे ही तफावत वाढत जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच हरित ऊर्जा प्रकारातील रिन्यूएबल एनर्जी निर्मिती वाढविणे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. ऊर्जा निर्मिती आणि पारेषण क्षेत्रातील तज्ञांच्या मते रिन्यूएबल एनर्जी ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त असते. त्यामुळे उपभोक्त्यांच्या खिशावरील भार हलका होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे या ऊर्जेच्या निर्मितीमुळे पर्यावरणास कुठलीही हानी होत नसल्याने ही वीज पर्यावरण पूरक असते. गुजरात राज्याच्या वाढत्या विकास दरामध्ये रिन्यूएबल एनर्जीचा वापर ही जमेची बाजू आहे. रिन्यूएबल ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या तुलनेत गुजरात राज्य महाराष्ट्र राज्यापेक्षा तब्बल दीडपट जास्त अक्षय ऊर्जा निर्माण करते. हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या महाराष्ट्रात १७.५ गिगा बॅट रिन्यूएबल ऊर्जा निर्मिती होते तर गुजरात राज्यात २७.५ गिगा वॅट ऊर्जा निर्मिती केली जाते. याच कारणामुळे गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्याला वीज घ्यावी लागते. परंतु रिन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातच सुरू झाली तर ऊर्जा सक्षमतेच्या दृष्टिकोनातून तो मैलाचा दगड ठरेल. अशा प्रकारच्या ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. पुनर्वापराजोगी वीज शेतकऱ्यांना पुरविल्यास दरडोई उत्पन्नासाठी येणारा खर्च कमी होईल. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी एका विशेष उच्चस्तरीय बैठकीमध्ये ट्रान्समिशन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत प्राधान्यक्रम देण्याबाबत संबंधित खात्यांना सूचना दिलेल्या आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीचा टक्का वाढल्यास विकसनशील महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये फार मोठा हातभार लागेल. अन्य सर्व निकषांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे महाराष्ट्र राज्य ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अव्वल स्थानी आल्यास त्याचा अनेक दृष्टीने फायदा होऊ शकतो. स्थानिकांना रोजगार, व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकतात. ऊर्जा सक्षम झाल्यामुळे नवनवीन उद्योगधंदे महाराष्ट्राकडे आकर्षित होतील. त्यायोगे पुन्हा एकदा राज्यामध्ये रोजगार आणि व्यवसाय यांच्या संधी निर्माण होतील. म्हणूनच राज्यातील नैसर्गिक पद्धतीने लाभलेल्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करून घेत रिन्यूएबल एनर्जी जसे पवन ऊर्जा,सौर ऊर्जा याद्वारे ऊर्जा निर्मिती वाढवणे हे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने हितावह ठरेल. सुत्रांच्या माहितीनुसार रिन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब, भूम आणि वाशी तालुक्याच्यात प्रयत्न केले जात आहेत.त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीला गती देण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनविण्यासाठी हे प्रकल्प वेळेत सुरू होणे अत्यंत निकडीचे आहे.सर्व सामान्य नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील. ऊर्जा मंत्रालयाने अधोरेखित केलेली उद्दिष्टपूर्तता झाल्यास रिन्यूएबल एनर्जी निर्मितीच्या पटलावर धाराशिव जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात नावाजला जाईल यात जराही दुमत नाही.
ह्या प्रकल्पना इतके महत्त्व असूनहि आणि रिन्यूएबल एनर्जी निर्माण करणाऱ्या सेरेंटिका नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱयांवर स्थानीय लोकांनी हल्ला करण्याची दुःखद घटना काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे. ह्या प्रकल्पाच्या कर्मचाऱयांवर दुसऱ्यांदा अश्या प्रकारचा हल्ला झाला आहे. ह्या घटनेची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.